सोमवार, २१ जानेवारी, २०१९

इतिहासाच्या मागावर : कोकणदिवा आणि कावळ्या बावल्या खिंड
रात्री पावणे बारा वाजता येणारी  'बोरिवली-सांदोशी'  हि एसटी तब्ब्ल १ तास उशिरा आली. 
आणि पनवेलच्या एसटी स्थानकात वाट बघत ताटकळत  राहिलेलो आम्ही 'गोंद्या आला रे ' अश्या अविर्भावात जणू   '' एसटी आली रे '' असं म्हणत जागेवरून एकदाचे  हलते झालो. 
म्हणावं तर एव्हाना , 
फटांक्यांची आतिषबाजी सुरु होऊन पुन्हा एकदा शुकशुकाट पसरला होता. 
इंग्रजी नवं वर्ष म्हणजेच '२०१९' धुमधडाक्यात अगदी शुभेच्छांचा  वर्षावात आणि आभाळातल्या  रोषणाईत दौडीनं चालून आलं होतं.  
वर्ष  '२०१८' ची सांगता झाली होती.  ३१ डिसेंबर काळाच्या डोहात मोठ्या थाटामाटात विराजमान झालं होतं. १ जानेवारीची लगभग नव्याने आता सुरु होणार  होती. नवे संकल्प , नव्या दिशा , नव्या योजना घेऊन  मनाची पालवी पुन्हा एकदा पल्लवित होणार होती. 

आम्ही हि सालाबादप्रमाणे आणि आमच्याच  रूढी परंपरेप्रमाणे '३१ डिसेंबर आणि १ जानेवारी'  हि ठरलेली  'सह्याद्री वारी'  ह्या वेळेस रायगडच्या प्रभावळीत म्हणजेच कोकण दिव्याशी शिक्कामोर्तब केली होती. 


त्यासाठी ८ जणांची तुकडी जातीने तयार होती. यतीन , सिद्देश , संपदा, हर्षदा , हर्षद, रश्मी, रोहन आणि मी  सज्ज होतो. 
आजोबांचा आदेशच होता. 
'' या...माझी अस्तित्वाची  हि लढाई आहे तोपर्यंत या '' 
 इतिहासाच्या त्या सुवर्णांकित पानाचा, त्या क्षणांचा , मी तुम्हाला दर्शन घडवेन, रायगडवरील तो देदीप्यमान शिवराज्याभिषेक सोहळा. ती घटनावळ ...
'' या सारे या '' 
कोकणदिवा जणू आजोबांच्या बोलीन साद घालत होता. आम्हा नातवांचं मन देखील आजोबांच्या ह्या भेटीसाठी आणि त्या सुवर्णांकित घडामोडीसाठी आतुरलं गेलं होतं. 
वेळ हि आता येऊन ठेपली होती. वाट बघून मरगलेली मनं, एसटी येताच पुन्हा प्रभावित झाली होती. 
प्रन्नतेचं झालर मनाशी गोंदल जात होतं.  

घाई गडबड  अशी नव्हतीच आता , आधीच रिसर्वेशन केल्याने निवांत असे होतो. 
शेवटची रांग हि  आमच्याच नावाने आरक्षित असल्याने..रात्रभर झोपेचं खुळखुळं होणार हे आधीच ठरलेलं. 
त्यात योगायोगा किंव्हा इतर काय म्हणा..
पेणच्या डेपोत एसटी दाखल होताच. 
नाटकाचा पडदा हळूच डोळ्यावरनं हटावा आणि हळूहळू रंगमंचावरील पात्र  जमेची बाजू घेत, रंगात येऊन नुसताच हशा पिकावा आणि कधी कधी तर तोल जाऊन  अगदी नकोस व्हावं  तशी आमची एकूण स्थिती झाली. थेट सांदोशीच्या आधीच्या गावापर्यंत म्हणजेच सावरट येई पर्यंत.  , 

आमच्या पुढच्याच  सीटवर आसनस्थ झालेल्या त्या स्त्रिया ....मोजून इन मिन तीन , मावशी म्हणावं अश्या ,  भरल्या एसटीत अक्षरशः  धुमाकूळ घालत होत्या . धुमाकूळ म्हणजेच वाद विवाद नाही हो, 
आपले ''दादा कोंडेकचे''  चित्रपट कसे दुय्यम बोलीचे , म्हणजेच डबल मिनींगचे  तसेच त्यांचं बोलणं अविरत सुरु होतं. 
काय ते ''पपी पासून चुम्मा'' आणि  तो ''म्हातारा बघ बघ कसा तिच्यावर लाईन मारतोय'' आता खेळा इथंच रात्रभर पकडापकडी...   इथपासून ते कुणाला त्रास होतं असेल तर उतरा खाली..आमची हि पिकनिकच  आहे,  असं काय ते बोलणं. मोबाईल गाणी तर विचारूच नका , मोठ्या आवाजात निनादत  होती. 
स्वातंत्र्याची व्याख्या इथे मला भलतीच आता व्यापक दिसू लागलेली .  निदान त्या तिघींसाठी तरी, 
असो, 
कधी एकदा सांदोशीला पोचतोय असं झालं होतं . अश्या विचार मंथनेत असतानाच एसटी नेमकी महाड डेपोत दाखल झाली आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. 
एसटीचा टायर देखील नेमका इथेच पंक्चर झालं असल्याने , पुढचा एक तास  ''पहाटे चार ते पाच''  आम्ही निवांत चहाचे ढोस चढवून आणि वडा- पावाचे लचके तोडत निभावून घेतला.  
पुन्हा एकदा चेहऱयावर तरतरी आली. नाही म्हणायला हवेतला गारवा तसा चिटकूनच होता . हुडहुडी भरली होती. त्यातच 
 पुढच्या एक तासात , एसटी अगदी सागराच्या लहरावर तरंगत राहावी तशी कच्च्या -  पक्क्या रस्त्यातून ..वर खाली करत गावोगाव जोडत जात होती. 

कुणाच्या कार्याला (तेराव्याला) आलेली शहराकडची  मंडळी  ( ह्यात त्या,  तीन स्त्रियांचा देखील समावेश होता ) सावरट' ला उतरती झाली आणि बहुतांश एसटी आता रिकामी झाली. 

चक्क ..टीसी , ते हि इथे , ह्या वेळेत, ? कसे काय ?  टीसी पाहिल्यावर  आम्ही सगळे अचंबित व्हायचे बाकी होतो.  
पहाटेचे साडेपाच वाजले होते. अंधार अजूनही सरला नव्हता. मिट्ट काळोख्यात एसटी 'सावरट' गावाच्या रस्त्याला शांत उभी होती. बोचरी थंडी हळूच कण्हत होती. 

एवढ्या पहाटे टीसी आणि  ते देखील अश्या खेड्यापाड्यात ..
कसे ? काहीतरी भानगड  असेल ?
प्रश्नांची अशी एकीकडे सरबत्ती  सुरू असतानाच,  सगळ्यांचे तिकीट आणि कंडक्टरकडील जमाखर्च चेक करत ते सर्व उतरते झाले. 
आणि एसटी पुन्हा दणक्यात चालती झाली. 

आता सांदोशीच्या पावनभुमीत जिथून त्या 'रणक्षेत्राकडे' कावळ्या बावल्या खिंडीकडे ..पाऊलवाट सरकते तिथे आमचे स्वागत होत होते..


क्रमश : 
पुढील भाग लवकरच 
संकेत पाटेकर .  
वेबसाईट लिंक : इतिहासाच्या मागावर : कोकणदिवा आणि कावळ्या बावल्या खिंड