रविवार, ९ एप्रिल, २०१७

कावल्या बावल्या खिंड - ऐतिहासिक रणभूमी

 

 पहाटे चार च्या प्रहारास थंडगार झुळकेने जाग आली . मी खिडकीतून जरा बाहेर डोकावून  पाहिलं.
उजळ ताऱ्यांनी काळेभोरं  आकाश दिव्य शक्ती एकवटून जणू  नटून सजलं होतं. 
त्याने मन सुखावलं. 

  दादर हुन रात्री साडे दहाच्या आसपास निघालेली  आमची  दुर्गवीरांची गाडी आता पाचाड हुन    पुढे सरली होती. आणि हळुवार एक पदरी कच्च्या रस्त्याने कावळ्या बावल्या खिंड  कडे तिची चाकं भिरभिरू लागली. त्याने तन- मन  अतिउत्साहिक नजरेने भोवताल परिसर न्याहाळू लागलं . रायगडाच्या प्रभावळीत आमचा केंव्हाच प्रवेश झाला होता. खुद्द रायगड/ दुर्गदुर्गेश्वर , आमचं प्रेरित स्थान , हृदयी मंदिर  ,आणि जिजाऊंचा  वाडा , हाकेच्या अंतरी होता. मनातूनच  कुर्निसात केलं. आणि इतिहासाची उजळणी करत , वळ्णावराचे घाट उतरत आम्ही ऐतिहासिक सांदोशी गावाशी पोहचते झालो.

पहाटे साडे चारचा तो प्रहर ..
गाडी एका ठिकाणी ,रस्त्या कडेला लावून धरली . एक एक  जण त्यातला पायउतार होतं. गावातल्या देवळाशी आता शिरू लागला. दिवस उजळण्यास , सूर्य देवतेचे आगमन  होण्यास , अजूनही दोन अडीच तासाचा अवधी होता. थकले भागलेले मंडळी विश्रंतीसाठी मिळेल त्या जागी पांघरून घेऊ लागले.  आणि काही जण मात्र देऊळा   बाहेर पडले. मोकळ्या उजळ भरल्या आकाशी .  नक्षत्रांचा  ते सुखद लेणं अनुभवण्यासाठी .  माझा हि त्यात समावेश होता .

रवळ्या जवळ्या  नंतर  जवळ जवळ तीन चार महिन्याने , मी असं सुख अनुभवत होतो. मोकळ्या आभाळाखाली  मी  एकटक उभा  होतो. चहू बाजूनी  सह्य कड्यांनी आपली टेहळणी  नजर एकजुटीने रोखत एक चौकट उभारली होती. हाती हात,  गुंफत साखळ दोरीनं , त्यांनी इथला परिसर  जणू आपल्या ताब्यात घेतला होता . त्यांच्या हा नित्यनेमाने सुरू असलेला जागर मनास भोवत  होता .  रात्रीच्या उजळ चांदण्यात अश्या पहाडी दृश्यांन  मात्र नजरेचं पारंण  फिटत होतं.   संमोहित व्हावं असाच काहीसा तो क्षण सुखदतेणे  गालाशी  हसत  होता. मनातूनच आरोळी फुटत होती. हरहर महादेव...जय शिवराय ..!

वसंत ऋतूच आगमन होऊन , दिवसाचे लोळ उठले होते .
उन्हाचे दिवस असल्याने पहाटेचा  गारवा  अंगा खांदयाशी  झुलू लागलेला.  मनाला शिवशिवत करत,  तो   हि हवा हवासा वाटतं होता. अवतीभोवतीच्या साऱ्या परिसराला त्याने आपल्या जादुई कुशलतेने व मायेच्या ममत्वेने थोपटवत जणू  शांत पहुडवल होतं. सारा परिसर अजूनही शांततेतं निवांत  निजलं होतं.
हसऱ्या उजळ ताऱ्यानी  मन मात्र एकीकडे मोहरत गेलं.  रायगडच्या  दर्शनांन ते अधिकच सुखावलं  जात होतं.  कोकण  दिव्याच्या पहाडी छातीनं अन   तिथल्या घडलेल्या अनन्य साधारण पराक्रमानं मनाभोवती प्रेरित वलय उमटलं  जात होतं . बस्स आता काही क्षणांचा अवधी बाकी होता. त्या जागेशी नतमस्तक होण्यास तन मन आतुरलेलं . कावळ्या बावल्या खिंड , तिथला रणसंग्राम अन ते एकूण वीर .....नजरेसमोर आपला पराक्रम दाखवून  देत होते . कोकणदिवा ते सर्व कथन करत होता. टप्प्याटप्प्याने .पहाटे पहिल्या  प्रहरी ...कोवळं सूर्य किरण हळूहळू सर्वत्र निथळू  लागलं . पाखरांचं  किलबिलनं तर आधीच सुरू झालेलं. क्षितिजावरची काळोखी रेघ आता  उजळून तेजधुंद झाली  होती. दुर्गदुर्गेवर रायगड , कोकण दिवा , एकूणच सारा पट्टा प्रकाश गर्दीत न्हाऊन निघाला  होता.  ते पाहून

सुधीर मोघांच्या ओळी हळूच ओठी स्वराने गाऊ लागल्या .

रान जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या साऊल्या
एक अनोखे लावण्य आले भरास भरास....

सृष्टीच्या ह्या नवं लाईने   मन अधिक प्रसन्न झालं होतं.

  प्रति १ 
  उजव्या हाताला दिसतोय तो कोकण दिवा आणि खिंड आणि  गर्द झाडीत पहुडलेलं  सांदोशी गावगावातली थोरी मोठी माणसं  आप-आपल्या कामाशी हातभार लावत , मग्न झालेली दिसत होती.   आजचा दिनक्रमच  त्यांचा जरा वेगळ्या वहिवाटेवरचा  ठरला होता.  कावल्या बावल्या खिंडीतील रणसंग्रामात  वीरमरण आलेल्या त्या शूरवीरांना  अभिवादन करण्यासाठी,   आजची खास अशी मोहीम आखण्यात आली  होती. २६ मार्च हि तारीख इतिहासात सुवर्णाक्षरात नोंदिवली  गेली. त्यालाच धरून , आजचा हा  कार्यक्रम होतं होता. त्यानिमित्तानेच  सारी व्यवस्था करण्यास त्यांचे हात एकत्रितपणे  जुंपले जात होते . सांदोशी गाव अभिमानाने पुरा एकवटला होता .  भगवं वादळ मना मनात मोठ्या  डौलाने अन अभिमानानं फडकत होतं. छत्रपती शिवरायांचा  गजर  मना मनातून उमटत होता .
आता वाट पायदळी घ्यायची होती इतकीच . तिथली माती ललाटी लावल्याची होती इतकीच....
बस्स काही क्षणाचा अवधी...

प्रति २ 
कोकणदिवा

दोन एक तासाच्या विश्रांतीतनंतर  शहराकडून आलेली मंडळी,  फ्रेश वगैरे होतं चहा नाष्टा  करण्यात मग्न झाली.  कांद्यापोह्याचा खमंग सर्वत्र असा  घमघमलेला. दुर्गवीरचे  संतोष दादा प्रेमानं आणि आवर्जून सर्वांची विचारपूस करत ,  कांदेपोह्याची थाळी हाती ठेवत होते. बस्स काही क्षणांचा अवधी आता  त्या रणभूमी कडे  रवाना व्हायचे इतकेच .

निघण्यापूर्वी दुर्गवीर चे अजित दादांकडून इथल्या  परिसराची अंत्यभूत माहितीची देवाणघेवाण  झाली.   आणि एकमेकांचा थोडक्यात परिचय सत्र घेत आम्ही सगळे कावल्या बावल्या खिंडीकडे  रवाना झालो.
****************************************************************
मळलेल्या पायवाटेतुन , लाल उधळ मातीतून पाउलं आता पुढे होऊ लागली. 
एक नवी ऊर्जाच जणू अंगभर संचारली होती प्रत्येकात.  पाउलं झपझप  करत पुढे पडत  होती .
सांदोशी गाव हि आता हळुवारं  नजरेआड होऊ  लागलं. रानावनातील  गर्द सावलीत आम्ही  प्रवेश करते झालो. उन्हाची पांढरुकी किरणं इंद्रधनूवानी जणू रंग बदलत , आकाशी उंचावलेल्या  वृक्षराजीतुन हळूच डोकावू लागली. आमचा मागोवा घेत जणू..., त्यांचा हि आपापसात लपंडाव सुरु होता.

इतरत्र पसरलेली 'सुकली पाने' मातीशी जिव्हाळ्याचं नातं सांगत 'प्रेममीठीने' पहुडली होती.
त्यावरून बळंच चालता चालता  नादब्रम्ह उमटू लागला. जवळ जवळ दोन एक तासांचं अंतर  कापलं गेलं होतं.
त्या 'पवित्र' ठिकाणी माथा टेकण्याचं केवळ क्षणांचा तो अवसर उरला होता .  
नजर आतुरलेली  ..स्वर चैन्याचा श्वास घेत .. इतिहासाची उजळणी करीत..
शरीर मात्र  घामजलेलं..काहीसं थकलेलं. 
घामाजल्या आणि थकल्या ह्या शरीरास , क्षणभर विश्रांती म्हणून थांबलो. नजर अवतीभोवती पसरली .

पहाडी छातीनं उभा ठाकलेला ‘कोकण दिवा’ ..गगनी उंचावला होता . आसपासच्या परिसरावर अजूनही जागता पहारा देत . आजही त्याच हे कार्य निष्ठेनं सुरु होतं. अन ते राहणार. काळ कितीही पुढे गेला तरीही.

"सह्याद्री नामा नग हा प्रचंड
हा दक्षिणेचा अभिमानदंड।
हाती झळाळे परशु जयाच्या..
स्कंधावरी दुर्गम दुर्ग तयाच्या...॥ 

उन्हाच्या तिरीप किरणांनं त्याचं  सौदर्य उजळून निघत होतं .   त्याकडे पाहता नजर आळवली गेली.
पहाडी मनाचा तो, आपलं सुख दुःख  मोकळ्या मनानं आता उघड करू लागला.
''आलात ..या...
केंव्हा पासून तुमची वाट पाहत होतो. आजोबांच्या सहवासात बागडायला अखेर आज वेळ मिळाला तुम्हास्नी, होय ना ? चला, आलात ते एक बरं केलंत... 
इतकं वर्ष मनाशी झाकोळलेला, एकवटलेला  हा इतिहास मला कुणाशी कथन करायचाच होता.  त्याला आज तुमची जोड मिळाली.
आजचा हा दिवस फार मोलाचा ..महत्वाचा. शूरत्वाचा , स्वराज्यातील निष्टेचा आणि प्राणप्रणाणे लढलेल्या त्या वीरांचा आहे . आजच्या ह्या दिवशीच  मराठ्यांच्या आपुल्या ह्या इतिहासात एक सुवर्णपान  सुवर्ण अक्षरांनी नोंदवलं गेलं . ते मला सांगायचं होतंच कुणाशी , तुम्ही आलात तर तुम्हास्नीच ते कथन करतो..चला..
मनात कुठेतरी असं संवादिक चक्र सुरु झालं.
तो इतिहास तो रणसंग्राम नजरेशी उतरू लागला. पायाखालची  वहिवाट हि आता अंतर ध्यानी झाली.


क्रमश :-
संकेत पाटेकर 
********************************************************************
 प्रति ३ 
 रम्य परिसर  

  प्रति ४
  दुर्गदुर्गेश्वर रायगडवेबसाईट : कावल्या बावल्या खिंड – ऐतिहासिक रणभूमी